सातारा जिल्हा बँक निवडणूक : कराडमध्ये शंभर टक्के मतदान, पाटणमध्ये चुरस
कराड सोसायटी गटात शंभर टक्के मतदान झाले, तर पाटणमध्ये देखील चुरशीने मतदान झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
कराड (सातारा) - कराड आणि पाटणमधील दोन मंत्र्यांच्या उमेदवारीमुळे राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज चुरशीने मतदान झाले. कराड सोसायटी गटात शंभर टक्के मतदान झाले, तर पाटणमध्ये देखील चुरशीने मतदान झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून मंगळवारी (दि. 23) होणार्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उंडाळकरांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक -
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे प्रथमच कराड सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकर यांनी सलग 54 वर्षे या मतदारसंघाचे जिल्हा बँकेत नेतृत्व केले होते. तसेच बँकेची सर्व सूत्रे त्यांच्या हातात होती. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने सलग सहावेळा नाबार्डचा पुरस्कार पटकावला होता. 4 जानेवारी रोजी विलासकाका उंडाळकरांचे निधन झाले. त्यानंतर बँकेची ही निवडणूक आहे. उंडाळकरांचे पूत्र अॅड. उदयसिंह पाटील यांनी सहकार मंत्र्यांपुढे आव्हान निर्माण केल्याने निकालाकडे राजकीय आणि सहकार वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.