कराड (सातारा) - पुणे-बंगळुरू महामार्गावर आयशर टेम्पोच्या धडकेत सातारा जिल्हा बँकेचे विकास अधिकारी जागीच ठार झाला. शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. रणजीत भाऊसाहेब नाईक (वय 49, रा. कोयना वसाहत-मलकापूर, ता. कराड), असे अपघातात ठार झालेल्या बँक अधिकार्याचे नाव आहे.
नाईक यांचा जागीच मृत्यू-
रणजीत नाईक हे कोयना वसाहत येथे वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी कामानिमित्त डीमार्टजवळ आल्यानंतर महामार्ग ओलांडताना पुण्याकडून कोल्हापूरकडे निघालेल्या आयशर टेम्पोने नाईक यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावर हेल्मेट होते. तरीही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस नाईक एस. आर. कदम यांनी घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघातातील मृत रणजीत नाईक हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील होते. नोकरीनिमित्त ते कोयना वसाहतीमध्ये राहत होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मसूर (ता. कराड) शाखेत ते विकास अधिकारी होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची वार्ता समजताच बँक कर्मचार्यांवर शोककळा पसरली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक भगवानराव पाटील यांचे ते जावई होते. या अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा-"कोस्टल रोड’ बोगद्याचे 100 मीटर पेक्षा जास्त खोदकाम पूर्ण, आदित्य ठाकरेंकडून पाहणी