सातारा - कोरोना लॉकडाऊनमध्ये राज्य आणि केंद्र शासनाने काही प्रमाणात सवलत दिली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात सध्या आहे ही परिस्थिती कायम राहणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील लॉक डाऊनची सध्यस्थिती कायम राखावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले महसूलाचे कारण पुढे करत शासनाने दारू विक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काही जिल्ह्यांमध्ये दारूची दुकाने उघडल्याच्या बातम्याही येत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज प्रसारमाध्यमांना निवेदन दिले. सातारा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लॉक डाऊनची सध्यस्थिती कायम राखावी. सातारा जिल्ह्याबाबत आज रात्री काही निर्णय घेतले जातील, त्याचे नागरिकांनी पालन करावे असे, सिंह यांनी सांगितले.
कंन्टेनमेंट झोनमध्ये किराणा दुकांनासाठी सवलत -
कंन्टेनमेंट झोन असलेल्या पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, तळमावले, मल्हार पेठ, नाडे (नवा रस्ता), तारळे इत्यादी ग्रामपंचायतींना अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, औषधांची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
सातारा नगरपरिषद क्षेत्रासह तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर, समर्थनगर व धनगरवाडी या ग्रामपंचायत क्षेत्रात किराणा साहित्य घरपोहच देण्यात येत आहे. जावळी तालुक्यातील धनकवडी, निझरे, करंदी त. मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी त मेढा, जवळवाडी, म्हाते खुर्द, म्हाते बु., वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर त मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी ते मेढा, सावली ही गावे व मेढा नगर पंचायत क्षेत्रामध्येही याच पद्धतीची सवलत देण्यात आली आहे. प्रांताधिकारी ज्या प्रमाणे यंत्रणा उभारतील त्या प्रमाणे किरणा साहित्य घरपोहच पुरवण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.