सातारा Satara Crime :अल्पवयीन मुलाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या कोरेगावमधील अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलं ( Satara Crime )आहे. आपल्या मैत्रिणीशी चॅटिंग करत असल्यानं त्याला अद्दल घडवण्यासाठी सोशल मीडिया अकाऊंट हॅक करुन त्यावरून पोस्ट व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती संशयिताच्या चौकशीतून समोर आली आहे.
काय आहे आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण ? :साताऱ्यात 15 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. त्यावरुन तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अल्पसंख्यांक समाजातील अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतलं होतं. तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील या घटनेची पाळेमुळे खणून काढण्याचं आवाहन प्रशासनाला केलं होतं.
सायबर सेल, एलसीबीनं केला उलगडा :साताऱ्यातील वातावरण तणावपूर्ण बनल्यानं स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलनं तांत्रिकदृष्ट्या तपास करून या घटनेचा उलगडा केला. पोलिसांनी कोरेगावमधील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यानं धक्कादायक माहिती दिली. आपल्या मैत्रिणीशी बोलतो, चॅटिंग करतो म्हणून त्या मुलाला अद्दल घडविण्यासाठी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटचा आयडी, पासवर्ड मिळवून आक्षेपार्ह पोस्ट केल्याची कबुली त्यानं दिली.
असा मिळवला आयडी आणि पासवर्ड :अल्पवयीन संशयित आरोपी त्याच्या मैत्रिणीसोबत सोशल मीडियावर चॅटिंग करायचा. त्याचवेळी ती मैत्रीण आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आधी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाशीही चॅटिंग करायची. ते संशयिताला आवडत नव्हतं. म्हणून संशयितानं 'आरोही' अशा स्त्रीदर्शक नावानं इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडलं. त्या अल्पवयीन मुलाशी चॅटिंग करत त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा आयडी व पासवर्ड मिळवला. त्यावरुन शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली आहे.
हेही वाचा :
- Satara Crime : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी अल्पवयीन संशयित ताब्यात, कार्यालयाची तोडफोड