सातारा - सततच्या दुष्काळाने हैराण असलेल्या खटाव आणि माण तालुक्यातील नागरिकांना आता कोरोनाने देखील चिंतेत टाकले आहे. मंगळवारी या दोन्ही तालुक्यात मिळून दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दीड महिन्यात एकही कोरोना रुग्ण नसणाऱ्या या तालुक्यात बाहेरुन प्रवास करून आलेल्या नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याने, परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
ठाणे येथील एक कुटुंब सहा मे रोजी दुचाकीवरून जिल्हा बंदीचे उल्लंघन करून खरशिंगे येथे आले होते. त्यानंतर त्यांच्यावर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या सर्वांना गावाजवळ होम क्वारंटाईनमध्ये करण्यात आले होते. मात्र, दहा मे रोजी संबंधित कुटुंबातील एका व्यक्तीला खुपच त्रास जाणवू लागल्याने सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा याबाबत तपासणी अहवाल आला. यात संबंधित त्रास होत असलेल्या व्यक्तीचा पहिला कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मात्र, त्यांच्या 21 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.