सातारा- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी नियमावली जाहीर केली आहे. नियमावलीनुसार आरती, भजन, किर्तन आदी कार्यक्रमात 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस मनाई करण्यात आली आहे. दिवसातून 3 वेळा मंडप परिसराचे सॅनिटायझेशन करावे, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
गणतपीच्या आगमन विसर्जनावेळी फक्त 5 लोकांनाची सहभागी होता येणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सक्त मनाई केली गेली आहे. या व अशा अटी-शर्थीची जंत्री असलेली यादी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (कोविड-19) वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात गणेशोत्सव 2020 हा सण अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरा करण्याबाबत, जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी निर्देश जारी केले आहेत.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जारी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथरोग अधिनियम, भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी नमुद केले आहे.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जारी केलेल्या सूचना
- सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पूर्वपरवनागी आवश्यक
- मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शने इत्यादी आयोजीत करण्यास मनाई
- मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फूटांच्या मर्यादेत असावी.
- घरोघरी जाऊन वर्गणी मागण्यास मनाई असेल.
- नागरिक आकर्षित होऊन गर्दी होवू नये याकरीता जाहिरातीच्या प्रदर्शनास मनाई
- आरती, भजन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांना 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस मनाई
- दिवसातून 3 वेळा मंडप परिसराचे सॅनिटायझेशन करावे
- आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात येत आहे.
- या कार्यक्रमास 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
- मिरवणुक, अन्नदान, महाप्रसाद इत्यादींना गर्दीला टाळण्याकरिता मनाई
- गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक द्वारे उपलब्ध करुन द्यावी.
- मंडपात निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी