महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील पाटणमध्ये कोरोनाचा शिरकाव, प्रशासकीय पातळीवर कडक उपाययोजना

कोरोना पार्श्वभूमीवर संबंधित रूग्णांची व संपर्कात आलेल्या गावांपैकी शिरळ, बनपुरी, शितपवाडी, कंकवाडी, मंद्रुळकोळे, मालदन, काळगाव, भारसाखळे आदी कन्टेन्टमेंट श्रेत्रातील गावातील येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे. सर्वच रस्ते बंद करून तेथे चेकपोस्ट तयार केले आहेत. त्याठिकाणी पोलीस व शिक्षक तैनात आहेत.

By

Published : May 21, 2020, 6:59 PM IST

सातारा -पाटण तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून कडक उपाययोजना प्रशासकीय पातळीवर राबविण्यात आल्या आहेत. शिरळ येथील कोरोनाबाधित रूग्ण बनपुरी येथील मृत महिला व भारसाखळे येथील संशयीत मृत व्यक्तीच्या कुटुंबीय, नातेवाईक व संपर्कातील लोकांना पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. येथे 44 लोकांना ठेवण्यात आले असून त्यापैकी काहींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर उर्वरित लोकांचे स्वॅब नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाबाधित व संपर्कात आलेल्या शिरळ, बनपुरी, शितपवाडी, कंकवाडी, मंद्रुळकोळे, मालदन, काळगाव, भारसाखळे आदी कन्टेन्टमेंट श्रेत्रातील गावे पूर्णतः सील करण्यात आल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.

कोयना विभागातील शिरळ येथील एका 70 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. संबंधित रूग्ण हा मंगळवारी प्राथमिक आरोग्य केंद्र हेळवाक ( कोयनानगर ) त्यानंतर पाटण येथील एका खासगी रुग्णालयात व तेथून ग्रामीण रूग्णालय पाटण येथे व सरतेशेवटी कृष्णा हाॅस्पीटल कराड येथे गेला. त्याला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याचा स्वॅब घेण्यात आला व तो पाॅझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच संबंधित रुग्णाच्या कुटुंबीय, संपर्कात आलेले डाॅक्टर्स त्यांचा कर्मचारी वर्ग यापैकी डाॅक्टर्सना होम क्वारंटाईन तर इतरांना पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

बनपुरी येथील मृत महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या नातेवाईक व संपर्कातील लोकांनाही पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे . याशिवाय मंगळवारी भारसाखळे येथील एक 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ससून रुग्णालय पुणे येथे झाला होता. त्याला रूग्णवाहिकेतून मूळगावी आणले जात होते. तथापि, प्रशासनाने संबंधित मृतदेह हा गावाच्या सीमेवरच अडवून तो कराडला पाठवला व तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नी, मुलांसह इतरांनाही पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील हाय रिस्कमधील डाॅक्टर्सना होम क्वारंटाईन तर इतरांना पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी म्हासोली येथील कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या तळमावले येथील नऊ व त्यानंतर मराठवाडी (दिवशी) येथील एक असे दहा तर आता एकूण 44 व्यक्तींना पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी सुरूवातीला आलेल्यांचे सोमवारी व मंगळवारी स्वॅब नमुने घेण्यात आले तर उर्वरित लोकांचे बुधवारी नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. परंतु भलेही हे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह आले तरीदेखील संबंधितांना काही दिवस कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षातच ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोना पार्श्वभूमीवर संबंधित रूग्णांची व संपर्कात आलेल्या गावांपैकी शिरळ, बनपुरी, शितपवाडी, कंकवाडी, मंद्रुळकोळे, मालदन, काळगाव, भारसाखळे आदी कन्टेन्टमेंट श्रेत्रातील गावातील येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे. सर्वच रस्ते बंद करून तेथे चेकपोस्ट तयार केले आहेत. त्याठिकाणी पोलीस व शिक्षक तैनात आहेत. दरम्यान, शिरळ येथील 15, भारसाखळे 4, तळमावले 9 आणि बनपुरी येथील 19 अशा एकूण 46 जणांना पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details