सातारा- राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सातार्यातील खटाव तालुक्यात भाविकांची ओमनी कार झाडावर आदळून चौघे जण जागीच ठार झाले आहेत. या भीषण अपघातात कारमधील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. धोंडेवाडी (ता. खटाव) येथील पेट्रोल पंपानजीक आज पहाटे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.
देवदर्शनाला जाताना काळाची झडप-सातारा जिल्ह्यातील धोंडेवाडी (ता. खटाव) येथील पेट्रोल पंपानजिक सूर्याचीवाडी गावच्या हद्दीत भाविकांची ओमनी कार झाडावर आदळली. त्यात तीन जण जागीच ठार झाले. तर गंभीर जखमींमधील एका महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर चौघे जण गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमी हे सिध्देश्वर कुरोली, बनपुरी गावातील आहेत. ते बाळूमामांच्या दर्शनाला निघाले होते. मात्र, वाटेतच त्या चौघांना काळाने गाठले.
भरधाव कार झाडावर आदळली-खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडुरंग देशमुख यांच्या ओमनी कारमधून सिध्देश्वर कुरोली आणि बनपुरी गावातील भाविक पहाटे देवदर्शनासाठी निघाले होते. खटाव तालुक्यातील धोंडेवाडीनजीक सुर्याजीवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. अपघातात मृत्यू आणि जखमी झालेल्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र, हे सर्वजण बनपुरी व सिध्देश्वर कुरोली गावातील आहेत. अद्याप, मृत आणि जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. वडूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.