सातारा: महाराष्ट्रातील संतांची आळंदी ते पंढरपूर वारी विविध अंगी विविध दर्शन दाखवणारी असते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील संस्कृती आणि संस्कार दाखवणाऱ्या या वारीमध्ये आता महिला सुद्धा पाठीमागे राहिल्या नाहीत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. दि. २३ जूनपर्यंत पालखी सोहळा तब्बल पाच दिवस सातारा जिल्ह्यात असणार आहे. रविवार (दि. १८) नीरा स्नानानंतर माऊलींचे जिल्ह्यात आगमन होईल. त्यानंतर पाच दिवस सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात मुक्काम असणार आहे.
पाडेगावात पालखी सोहळ्याचे स्वागत : पाडेगाव येथे सातारा जिल्ह्याच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत केल्यानंतर, रात्री लोणंद येथे हा सोहळा मुक्कामी राहील. सोमवारी ( दि. १९) पालखी लोणंद येथेच मुक्कामी असणार आहे. लोणंद येथील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर मंगळवारी (दि. २०) पालखी सोहळा तरडगाव (ता. फलटण) येथे मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे.
रविवारी पहिले रिंगण : रविवारी दुपारी चारच्या दरम्यान चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर तरडगाव येथे ज्ञानेश्वर पालखीचा मुक्काम राहील. बुधवारी (दि. २१) पहाटे पाच वाजता पालखी सोहळा फलटणकडे प्रस्थान करेल. दत्त मंदिर काळज, सुरवडी, निंभोरे ओढा, वडजल येथे विसाव्यासाठी पालखी काही वेळ थांबेल. त्यानंतर सायंकाळी पालखी सोहळ्याचा फलटण विमानतळावर मुक्काम आहे.