सातारा : कोल्हापूरहुन पुण्याकडे कुरिअर घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा थरारक पाठलाग करून सशस्त्र लुटारूंनी गाडीतील ७ किलो सोने-चांदीच्या विटांची लूट करून पलायन केले. पुणे-बंगळुरू महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली. लुटारूंचा पाठलाग करताना पोलिसांना पिकअप गाडी सापडली, मात्र मुद्देमाल घेऊन संशयित पसार झाले.
लूट करून दरोडेखोर पसार :कोल्हापूर येथील एका कुरिअर कंपनीचे कर्मचारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पिकअप गाडीतून सोन्याच्या विटा, चांदी घेऊन पुण्याला निघाले होते. कुरिअरची गाडी बोरगाव हद्दीत आल्यानंतर पाच सशस्त्र दरोडेखोरांनी पिकअप गाडीचा थरारक पाठलाग करून गाडी थांबवली. शस्त्राचा धाक दाखवून अंदाजे सात किलो वजनाच्या सोने-चांदीच्या विटांची लूट करून दरोडेखोर पसार झाले.
पिकअप गाडी सापडली, दरोडेखोर निसटले :या धाडसी दरोड्याची माहिती मिळताच बोरगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली. एक पथक पुण्याच्या दिशेने रवाना केले. लुटारूंचा पाठलाग करताना पोलिसांना पिकअप गाडी महामार्गावर सापडली, मात्र सोने-चांदी घेऊन दरोडेखोर इनोव्हा कार, दुचाकीवरून पसार झाले. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचा हा थरार घडला.
भांडूपमध्ये विद्यार्थ्याचा खुन : मित्राला झालेल्या मारहाणीनंतर गॅंग विरोधात पोलिसांत साक्ष दिल्याच्या रागातून चाैघांनी १९ वर्षीय विद्यार्थ्यावर भररस्त्यात कटरने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री भांडूपमध्ये घडली. याप्रकरणी भांडूप पोलिसांनी अनिकेत गायकवाड नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.