सातारा -कोरोनाचा वाढलेला ज्वर कमी होत असताना महागाईच्या चटक्यांची दाहकता वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. खाद्यतेलाबरोबरच तूरडाळ, हरभरा डाळ, ज्वारी यासारख्या रोज लागणाऱ्या वस्तूंच्या किंमती वाढल्याने गृहिणींचे आर्थिक नियोजन ढासळले आहे.
'वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले' किचनमध्ये लागणाऱ्या नित्यनियमाच्या वस्तूंचे भाव वधारले -
दीड वर्षांपासून कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. या साथरोगामध्ये अनेकांना स्वतःच्या रोजगाराबरोबरच काहींना नोकरीही गमवावी लागली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी चोरून मारून व्यवसाय केले. बाजारातील तुटवड्याचा लाभ उठवत अनेकांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले. लॉकडाउनची परिस्थिती संपून जनजीवन पूर्वपदावर आले की किंमती कमी होतील, अशी सामान्यांची आशा होती. मात्र, मोठे व्यापारी जादा भावाने वस्तू विकत असल्याचे सांगत छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवल्या. त्यामुळे खाद्यतेलाचे भाव 180 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले. याशिवाय तूरडाळ, हरभरा डाळ, ज्वारी, गहू या किचनमध्ये लागणाऱ्या नित्यनियमाच्या वस्तूंचे भाव वधारले. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलने शंभरी पार केली. पेट्रोल बरोबरच डिझेलच्या दरातही फुगवटा झाला आहे. साथरोगामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने खासगी रिक्षा वाहतूक हा एकमेव आधार सर्वसामान्यांना होता. मात्र, रिक्षाचालकांनी लोकांची अडवणूक केल्याच्या तक्रारी आहेत.
आर्थिक कोंडीचा सामना -
कोरोना साथरोग्याच्या परिस्थितीमुळे उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. लोकांना पगार नाहीत, ज्यांना मिळतात त्यांना पूर्ण पगार मिळत नाही. काम नसल्याने लोकांना कामावरून कमी केले गेले. नोकरी नाही, व्यवसाय बंद अशा परिस्थितीत किती दिवस लोक पूर्व कमाईवर जगणार. त्यातच ही भाव वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पेट्रोल आणखी किती वाढणार? -
येथील किराणा व्यवसायिक संजय पवार 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले, "विविध प्रकारच्या डाळींचे दर 90 वरून 120 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. तेल 130 वरून 180 वर पोहोचला आहे. तेलाच्या किंमतीत तब्बल 50 रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीचे दरही वाढल्याने ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम झाला आहे." अशोक घाडगे (रा. कोंडवे) म्हणाले, "पेट्रोलचा दर शंभरी ओलांडून 104 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आज स्वतःची दुचाकी सांभाळने दरवाढीमुळे अवघड झाले आहे. दर आणखी किती वाढणार सांगता येत नाही. पेट्रोलवरच सर्व वस्तूंच्या किंमती अवलंबून असल्यामुळे त्यांचीही भाववाढ होणे स्वाभाविक आहे. मात्र, ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही."
उत्पन्न घटले, खर्च वाढला -
नोकरदार असो किंवा व्यवसायिक कोरोना आल्यापासून प्रत्येकाच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईला तोंड देणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याचे मत व्यंकटपुरा पेठेतील संयोगिता बारसावडे यांनी नोंदवले. दौलतनगर मध्ये राहणाऱ्या रोहिणी पवार यांनी प्रत्येक गृहिणीचं स्वतःच एक बजेट ठरलेलं असतं. सर्वच वस्तूंचे भाव वाढल्यामुळे कुटुंबाचं बजेट ढासळले असल्याचे सांगितले.