कराड (सातारा) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील 14 गावांतील खासगी क्षेत्रावरील जमीन खरेदी-विक्री व्यवहारावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या सूचनेवरून ही कार्यवाही झाली असून निर्बंध उठविल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने खासदार पाटील यांना पत्राद्वारे कळविली आहे.
पाटण तालुक्यातील 14 गावे कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधून वगळण्यात वगळण्यात यावीत, यासाठी सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला होता. मात्र, त्या 14 गावातील शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या जमिनीच्या सातबारावर असणारे निर्बंधाचे शिक्के काढून टाकण्यात यावेत, यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती सत्यजितसिंह पाटणकर यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना केली होती. त्यानुसार खासदार पाटील यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पत्र लिहून निर्बंधाचे शिक्के काढून टाकण्यात यावेत, अशी सूचना केली होती.