सातारा -ग्रामीण भागात बियरबार सुरू करायचा असेल तर संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असतो. अशाच एका बियरबारच्या परवानगीसाठी विरवडे (ता. कराड) या ग्रामपंचायतीने गावाला स्वागत कमान बांधून देण्याची आणि प्रस्तावित बियरबारच्या ( Beer Bar Permit Virawade Village ) जागेतून गावाला 20 फुटाचा रस्ता करून देण्याची अट घालून बारच्या परवानगीचा ठराव घेतला आहे. या सर्व बाबींचा उल्लेख ग्रामपंचायतीने प्रोसिडींगवर देखील घेतला आहे. त्यामुळे कराड परिसरात हा विषय चर्चेचा ठरला आहे.
जादा अधिकाराचा गाव कारभार्यांकडून दुरूपयोग :ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रकारच्या कामांना परवानगी देण्याचे जादा अधिकारी अलिकडे ग्रामपंचायतींना मिळाले आहेत. त्यामुळे सरपंच व सदस्यांचे महत्व वाढले आहे. मात्र, गाव कारभारी अनेकदा नियमांच्या चौकटी मोडून शासनाने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करताना दिसतात. असाच कारनामा बिअरबारला परवानगी देताना पाहायला मिळाला आहे. ओगलेवाडीनजीकच्या विरवडे ग्रामपंचायतीने बियरबारला परवानगी देण्याचा ठराव मंजूर करताना गावची स्वागत कमान बांधून देण्याची आणि त्या मिळकतीतून रस्ता करून देण्याची अट घातली आहे. विरवडे ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या या झिंगाट कारभाराची जोरदार चर्चा आहे.
अटी-शर्तींचा प्रोसिडींगमध्येही उल्लेख :विरवडे ग्रामपंचायत धुंद कारभार प्रोसिडींगमध्येही पहायला मिळाला. बियरबारला परवानगीसाठी गाव कारभार्यांनी प्रस्तावकाला घातलेल्या स्वागत कमान आणि रस्ता करून देण्याच्या अटींचा प्रोसिडींगमध्ये उल्लेख केला आहे. त्यामुळे बियरबारला देण्यात आलेला परवानगीचा ठराव आता वादात सापडला असून विरवडे ग्रामपंचायतीचा अजब आणि तर्हेवाईक कारभार टिंगलीचा विषय बनला आहे.