सातारा -जिल्ह्यातील पश्चिम घाट प्रदेश हा नेहमीच जैवविविधतेचे माहेरघर राहिलेला आहे. येथीलच ठोसेघर-चाळकेवाडी व कास परिसरातून साताऱ्यातील संशोधकांना चतुर (सुई) डॅमसेलफ्लायच्या दोन नवीन प्रजातींची नोंद करण्यात यश मिळवले आहे.
नामांकित शोधपत्रिकेकडून नोंद
साताऱ्यातील कीटक/फुलपाखरू अभ्यासक डॉ. श्रीराम भाकरे, प्रा. डॉ. प्रतिमा पवार व सुनील भोईटे या तीन संशोधकांनी त्रिवेंद्रम (केरळ) येथील डॉ. कलेश सदाशिवन आणि विनयन नायर यांच्या सहकार्याने हे यश प्राप्त केले आहे. युफाईया वर्गांतील या दोन नव्या प्रजाती आता 'युफाईया ठोसेघरेन्सीस' व 'युफाईया स्युडोडीस्पार' या नावाने ओळखल्या जातील. यासंबंधीचा शोधनिबंध नुकताच भारतातील नामांकित शोधपत्रिका 'जर्नल ऑफ थ्रेटंड टाक्सा'च्या 26 एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाला.
ठोसेघरच्या नावाने नोंद
पश्चिम घाटात यापूर्वी नोंद झालेल्या तीन प्रजातींमध्ये या दोन नव्या प्रजातींची आता भर पडलेली आहे. 'युफाईया ठोसेघरेन्सीस' ही प्रजाती एकदमच वेगळी व नवीन तसेच फक्त आणि फक्त ठोसेघर-कास परिसरातच आढळणारी असल्यामुळे तेथील निसर्ग-जैवविविधतेचे प्रतिक म्हणून प्रजातीस ठोसेघरचे नाव देण्यात आले आहे.