सातारा -कडाक्याच्या थंडीमुळे महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठल्याचे आढळून आले आहे. आज पहाटे महाबळेश्वरचे तापमान 11.3 अंश सेल्सिअस तर साता-याचे तापमान महाबळेश्वर पेक्षाही कमी म्हणजे 9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
साताऱ्यात पारा घसरला
साताऱ्यामध्ये थंडीचा कडाका वाढू लागला आहे. सोमवारी साताऱ्यात चालू हंगामातील निचांकी तापमानाची नोंद झाली. थंडी वाढल्यामुळे येवतेश्वर घाट, कुरणेश्वर, संगमनगर, अजिंक्यतारा किल्ला याठिकाणी फिरायला जाणा-या नागरिकांची संख्या रोडावली आहे. गुलाबी थंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर पेक्षाही साताऱ्याचा पारा दोन अंशांनी कमी होता. महाबळेश्वरमध्ये आज पहाटे 11.3 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेल्याची माहिती हवानाम खात्याने दिली आहे.
महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले
महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात सकाळी दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले, बोट क्लबवर तसेच परिसरातील छोट्या झुडपांवर गोठलेले दवबिंदू पाहायला मिळाल्यामुळे पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे. कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणी पर्यटकांनी शेकोट्या देखील पेटवल्या होत्या. येत्या काही दिवसात सातारा- महाबळेश्वरचे तापमान आणखी खाली येईल असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
महाबळेश्वरमध्ये पारा घसरला महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी
ख्रिसमसच्या सुट्या व नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा करण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. वाढत्या थंडीमुळे पर्यटक आनंदून गेले आहेत. कोविडमुळे सहा ते आठ महिने महाबळेश्वरमधील पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायावर परिणाम झाला होता. पर्यटकांची पावले पुन्हा महाबळेश्वरकडे वळल्याने येणारा हंगाम चांगला जाईल असा आशावाद महाबळेश्वरमधील व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.