सातारा- सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ 'इंडोसिल्व्हिराना सीझरी' अर्थात महाराष्ट्र सोनेरी पाठीचा बेडूक आढळला आहे. हा बेडूक प्रदेशनिष्ठ असून आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात दोनदा याची नोंद झाली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा पुढील दहा वर्षांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल गोविंद लेंगुटे कार्यरत आहेत. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या पहिल्या पाहणी दौऱ्यात माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व हेमंत केंजळे यांना ह्या दुर्मिळ प्रजातीचे दर्शन झाले.रोहन भाटे यांनी याबाबतची माहिती दिली.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ सोनेरी बेडकाची प्रथमच नोंद एका धबधब्यावर या बेडकाचे अस्तित्व
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अभ्यास दौऱ्यावर असताना अतिशय दुर्गम भागातील एका धबधब्यावर या बेडकाचे अस्तित्व आढळून आले. दिल्ली विद्यापीठाचे डॉ. बिजू दास व त्यांच्या सहकाऱ्यांना २०१४ साली भारतातील सात लुप्त उभयचर बेडूक प्रजातींचे शोध लागले होते. त्यामध्ये हा बेडूक प्रथम सिंधुदुर्ग येथे सापडला होता. आंबोली येथेही या बेडकाची नोंद झाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील उच्च व तीव्र उतार तसेच खडकाळ प्रवाह असलेल्या काही दुर्गम भागातील धबधब्यावर यांचे अस्तित्व आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून वारणा-कोयना या नद्या प्रवाहित होतात. वारणा नदीचा उगम तर चांदोली राष्ट्रीय उद्यानातूनच होतो. या दोन्ही नद्यांवरच चांदोली व कोयना धरण बांधण्यात आले आहे. या जातीविषय, त्याच्या प्रजनन व इतर शास्त्रीय माहितीवर फारसा अभ्यास झालेला नाही. तथापि, ही नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अभिमानाची बाब आहे.
सह्याद्री प्रकल्पाला समृद्धतेचा वारसा
सह्याद्री हे जगातील जैवविविधतेने समृद्ध असे महत्वाचे स्थान आहे. लवकरच लुप्त होण्याचा धोका असलेल्या व केवळ याच भागात आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी व इतर प्रजाती यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. या प्रदेशात अनेक मोठे जलसाठ, नद्यांचे उगम तर आहेतच. शिवाय येथील संरक्षित अमुल्य, अद्वितीय पर्यावरण प्रणाली महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया आहे. शुध्द हवा व पाण्यासाठीचे सह्याद्री हे फुफुस आहे. या जंगलांमुळेच आपले पाण्याचे स्तोत्र शाबूत राहतील, असे मत माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी व्यक्त केले.