सातारा : फलटण तालुक्यात आमदार रामराजे आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात राजकीय द्वंद सुरू झाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून विकासकामांवरून श्रेयवादाचा कलगीतुरा रंगल्याने फलटणचे राजकारण भलतेच तापले आहे. दिल्ली मुंबईत सत्तांतर झाले म्हणून फलटणमध्ये सत्तांतर होईल, अशी स्वप्ने बघू नका, असा टोला रामराजेंनी लगावला, तर आपण वेगाने विकासकामे केल्याने रामराजेंना धक्का बसला असल्याची उपरोधिक टीका खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी केली आहे.
फलटणमध्ये श्रीरामाचेच राज्य राहणार :दिल्लीत व मुंबईत सत्तांतर झाले म्हणून फलटणमध्ये कुणी सत्तांतराची स्वप्ने बघू नयेत. जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत इथे सत्तांतर अशक्य आहे. कोणी कितीही नेते आणुद्यात. इथे राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच राहणार. बाकी कुणाचे चालणार नाही, असा टोला आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना लगावला. खासदारकीच्या माध्यमातून फलटण शहर आणि तालुक्याचे सोने करायची त्यांना संधी होती. मात्र, बोलण्यापलिकडे त्यांनी काही केले नाही, करुही शकत नाहीत. निवडणूका जवळ आल्या असून त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे अशी खरमरीत टीका देखील रामराजेंनी केली.
आयत्या पिठावर रेघोट्या :विरोधकांमध्ये क्षमता नाही. माढा लोकसभा मतदारसंघात खासदारांबद्दल लोक काय बोलतात हे आपणास चांगले माहिती आहे. दांडगी हौस, राक्षसी महात्वकांक्षा तसेच काम करण्याची ताकद आणि इच्छा नसणार्यांसोबत जाऊन जनतेला चालणार नाही. नीरा-देवघर प्रकल्पाचे मीच भूमीपूजन केले, टेंडर काढले, 66 किलोमीटर पाणी आणले. आता कालवे काढायला जमिनीच्या किंमती वाढल्याने पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यात येणार आहे. त्याचे टेंडरही झाले असेल. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील असतानाच हा निर्णय झाला आहे. कष्ट माझे आणि आयत्या पिठावर ते रेघोट्या मारत आहेत, अशी टीका रामराजेंनी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा नामोल्लेख टाळून केली.