सातारा - ज्यांना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार, अशी खोचक टीका केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर केली आहे. भारत जोडो यात्रेला भारत तोडो यात्रा संबोधत काँग्रेस पक्षाची अवस्था गलितगात्र झाली असल्याचा हल्लाबोलही आठवलेंनी केला आहे.
पंतप्रधान मोदींनी सगळा देश जोडला -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. राहुल गांधींना स्वतःचा पक्ष जोडता येत नाही, ते देश काय जोडणार? पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामना करणारा देशात सध्या दुसरा कोणीही नेता नाही. बिहारचे नेते नितीशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांना भेटत असले तरी मोदींशी सामना करणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल, असा टोला आठवलेंनी विरोधकांना मारला.