साताराPrithviraj Chavan on Ram Mandir: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना, घराणेशाही, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मंदिर उभारणीचं काम पूर्ण होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागणार असताना निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठापनेची घाई केली का? हा धार्मिक कार्यक्रम आहे की राजकीय? असे थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सातार्यात माध्यमांशी बोलताना केलं आहे.
मोदींच्या व्यासपीठावरच घराणेशाही :घराणेशाहीच्या आरोपावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बोलणं सोपं असलं, तरी मोदींच्या व्यापसीठावर घराणेशाही असलेले किती लोक बसले आहेत, ते त्यांनी पाहावं. अनुराग ठाकूर कोण आहेत? अमित शाहांची मुलं कशी अॅडजस्ट झाली. महाराष्ट्रात बाप-लेकांच्या प्रतिनिधीत्वाची किती तरी उदाहरणे आहेत. घराणेशाहीचं नाव घेऊन फक्त गांधी घराण्याला टार्गेट करण्याशिवाय मोदी काही करत नाहीत. परंतु, त्यांचं कर्तृत्व, बलिदान पाहा. इंदिरा गांधी, राजीव गांधींचं बलिदान मोदी विसरले का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
राष्ट्रपती, शंकराचार्यांना निमंत्रण का नाही? :पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या अधिकारानं राम मंदिर प्रतिष्ठापना करताहेत, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. राष्ट्रपतींना का बोलावलं नाही. त्या विशिष्ट समाजाच्या आहेत म्हणून का? असे अनेक प्रश्न आहेत. मंदिर अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठापना करणं चुकीचं असल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे. आता काय करायचं ते मोदी ठरवतील, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.