महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राधिकाच्या जिद्दीपुढे गगनही ठेंगणे.. फौजदार बनलेल्या राधिकाच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी.. - राधिका हजारे कराड

लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या राधिकाने तिच्या भावांसह परिस्थितीशी झुंज देत शिक्षण पूर्ण केले. घरकाम करत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. अखेर तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. अन् राधिका फौजदार झाली. पाहुयात तिच्या या संघर्षमय जीवनाची कहाणी..

राधिकाच्या जिद्दीपुढे गगनही ठेंगणे.. फौजदार बनलेल्या राधिकाच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी..
राधिकाच्या जिद्दीपुढे गगनही ठेंगणे.. फौजदार बनलेल्या राधिकाच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी..

By

Published : Mar 19, 2022, 3:33 PM IST

कराड (सातारा) - जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या यशाला गवणसी घालत वराडे (ता. कराड) या गावातील राधिका हजारे फौजदार बनली आहे. लहानपणीच आई-वडीलांचे छत्र हरपल्यानंतर दोन भाऊ आणि राधिका एकमेकांचा आधार बनले. फौजदार बनण्यासाठी परिस्थितीशी राधिकाने केलेला संघर्ष रोमांचक आहे. तिच्या जिद्दीपुढे गगनही ठेंगणे झाले. राधिकाच्या जिद्दीचा हा संघर्षमय प्रवास स्पर्धा परीक्षा देणार्‍यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

राधिकाच्या जिद्दीपुढे गगनही ठेंगणे.. फौजदार बनलेल्या राधिकाच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी..

आई-वडीलांच्या निधनानंतर तुटला आधार..

राधिका पाचवीत असताना तिच्या वडीलांचे आणि सातवीत असताना आईचे निधन झाले. राधिका आणि तिच्या दोन भावांचा आज्जीने सांभाळ केला. कालांतराने आज्जीचेही निधन झाले. आज्जीच्या निधनानंतर राधिका आणि दोन्ही भावांचा आधारच तुटला. तरीही खचून न जाता तिच्या थोरल्या भावाने सेल्समनची नोकरी करत कुटुंबाला आणि राधिकासह लहान भावाच्या शिक्षणाला हातभार लावला. राधिका घरकामाची जबाबदारी सांभाळत शिकत होती.

रोज दीड किलोमीटरची पायपीट..

राधिका ही कराडमधील पंताच्या कोटातील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात अभ्यास करत होती. हे महाविद्यालय कराड बसस्थानकापासून दीड किलोमीटरवर आहे. अर्थिक परिस्थितीमुळे रोज रिक्षाने प्रवास करणे तिच्या आवाक्याबाहेरचे होते. म्हणून ती बसस्थानकापासून रोज महाविद्यालयापर्यंत पायी चालत जायची. परिस्थितीची जाणीव ठेऊन अभ्यास करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाली. आपण घेतलेल्या कष्टाचे अखेर चीज झाले, याचे राधिकाला समाधान आहे.

फौजदार होण्याच्या जिद्दीने परिस्थितीलाही नमवले..

आपण पोलीस खात्यातच जायचे. फौजदार व्हायचे, अशी मनाशी खूणगाठ बांधून राधिकाने स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली होती. दोनवेळा तिला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. परंतु, तिसर्‍या प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली. 2019 मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल दोन वर्षांनी जाहीर झाला. स्पर्धा परीक्षेत राधिका उत्तीर्ण होऊन फौजदार झाली. या यशापाठीमागे तिने घेतलेले कष्ट देखील महत्वाचे आहेत. फौजदार होण्याच्या राधिकाच्या जिद्दीपुढे परिस्थिती देखील नमली.

राधिकासाठी धावली प्राध्यापकांमधील माणुसकी..

राधिकाची कौटुंबिक परिस्थिती आणि तिची फौजदार होण्याची जिद्द पाहून शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे कॉलेजच्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. बी. एस. खोत, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे यांनी राधिकाच्या प्रत्येक अडचणीत माणुसकीच्या नात्याने तिला मदतीचा हात दिला. उंब्रज-कराड पर्यंतच्या एसटी पाससाठी लागेल तेव्हा पैसे दिले. अभ्यासाची पुस्तके, जुने प्रश्नसंच उपलब्ध करून दिले. गुरूजनांनी वेळोवेळी केलेली मदत आणि मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ध्येय गाठू शकले, असे राधिकाने सांगितले.

राधिकाच्या यशाने कर्नल संभाजी पाटील देखील भारावले..

कराडमध्ये विजय दिवस सोहळा सुरू करणारे कर्नल संभाजी पाटील यांच्यापर्यंत राधिकाच्या यशाची बातमी पोहोचल्यानंतर त्यांनी राधिकाशी मोबाईलवर संवाद साधून राधिकाचे अभिनंदन केले. कौटुंबिक परिस्थितीची विचारपूस केली. आई-वडीलांचे छत्र हपरले असताना परिस्थितीवर मात करत फौजदार झाल्याचे ऐकून कर्नल संभाजी पाटील देखील भारावून गेले. तुझे यश सामान्य कुटुंबातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी आहे. आता नाशिकमध्ये तुझे ट्रेनिंग सुरू होईल. ट्रेनिंगमध्ये प्रत्येक टप्प्यावर तू अव्वल आली पाहिजेस, असे सांगत कर्नल संभाजी पाटील यांनी राधिकाला शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details