सातारा- "मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासाल तर हा रणजित ९६ पिढ्यांपासून नाईक निंबाळकर असल्याचे पाहायला मिळेल". परंतु तुमचं काय तुम्ही स्वतःला नाईक-निंबाळकर म्हणता आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगाता. मात्र, तुमच्या आईचे आणि वडिलांचे लग्न झाले असेल तर त्या लग्नाचा दाखला मला दाखवा. आणि जो कोणी मला दाखला देईल त्याला मी एक हजाराचे बक्षीस देईन. कारण, रामराजे हे बिन लग्नाची अवलाद आहेत आणि हा इतिहास आहे, असा घणाघाती आरोप माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केला आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर फलटनमध्ये आयोजित सभेत बोलताना निंबाळकर यांनी हा जिव्हारी लागणारा घणाघात केला आहे.
रामराजेंचे वडील मालोजीराजांनी त्यांना घरात घेतले नव्हते. मला त्यांच्याविषयी वाईट बोलयाचे नव्हते, परंतु बोलण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. तसेच फलटण तालुक्यात आता नवीन जीआर आलेला आहे. त्या जीआरनुसार इथे केलेली पापं इथेच फेडायची आहेत. त्यामुळे रामराजे यांनी केलेल्या पापांची फळं आणि शिक्षा ठरलेली आहे, असा निशाणाही त्यांनी रामराजेंवर साधला.
माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेनेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पाऊण लाखाच्या मताधिक्क्याने विजयी झाले त्यानंतर शुक्रवारी त्यांची फलटण येथे जाहीर सत्कार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते राम नाईक निंबाळकर, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, सातारा जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष अनिल देसाई उपस्थित होते.