सातारा- लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या एका नामांकीत शूज शोरूमच्या मालकाचे २ कोटींसाठी अपहरण करण्यात आले व त्यानंतर त्याचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्यांनी साताऱ्यातील लोणंद येथे सकाळी गोळी घालून व्यापाऱ्यास ठार केले.
चंदन कृपादास शेवानी (वय. ४८, रा. बंडगार्डन) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यावसाय आहे. लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. शेवानी शनिवारी दिवसभर घरी होते. त्यानंतर ते रात्री घराबाहेर पडले. रात्री साडे दहा वाजल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, कुटुंबीयांनी तत्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही चंदन शेवानी यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता.