कराड (सातारा)- कराड शहर आणि तालुक्यात बुधवारी (दि. 16 जून) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कराडजवळच्या गोटे गावाच्या हद्दीत महामार्ग आणि उपमार्ग जलमय झाला आहे. कराड-सातारा या लेनवरील वाहतूक दुसर्या लेनवर वळविण्यात आली असून महामार्ग मदत केंद्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कराडपासून चार किलोमिटर अंतरावर महामार्गालगत वसलेल्या गोटे गावाच्या हद्दीत महामार्ग आणि उपमार्गांची कामे सदोष झाली आहेत. तसेच गोटे गावाच्या हद्दीत वीटभट्टी व्यावसायिकांनी नैसर्गिक ओढ्याचे प्रवाह बंद केले आहेत. काही ठिकाणचे प्रवाह बदलले आहेत. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे खासदार श्रीनिवास पाटील यांचे निवासस्थानही जलमय झाले होते. बुधवारी रात्रभर झालेल्या पावसानंतर महामार्गावर पाणी आल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले आहेत.
कराड तालुक्यातील13 मंडलांमध्ये मागील 24 तासांत 1 हजार 145 मिलीमीटर पावसाची नोंद
मंडल | पाऊस (मिलीमिटरमध्ये) |
कराड मंडल | 95 |
मलकापूर | 93 |
सैदापूर | 90 |
कोपर्डे हवेली | 98 |
मसूर | 75 |
उंब्रज | 85 |
शेणोली | 88 |
कवठे | 82 |
काले | 80 |
कोळे | 87 |
उंडाळे | 85 |
सुपने | 99 |
इंदोली | 88 |