सातारा - मारहाण करून मानसिक त्रास दिल्याने फलटणमधील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशांत सुरेश काळे (वय 29, रा. पंढरपूर नाका, पुजारी कॉलनी, फलटण) असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत प्रशांत गजानन चौक येथील जिममध्ये व्यायाम करुन इतर मुलांना प्रशिक्षण देत. प्रशांत यांचा चुलत भाऊ संजु वसंत काळे (वय 35) हा 21 तारखेला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घराच्या बाहेर उभे होते. यावेळी प्रशांत तिथे आले. त्यावेळी प्रशांत मानसिक तणावाखाली होता. यावेळी प्रशांतने सांगितले, 19 तारखेला रेणुका या भावाच्या मुलीला मोटार सायकलवरुन भोईटे क्लासेस येथे सोडण्याकरिता जात असताना गिरवीनाका येथे आल्यावर माझे प्रेमसंबंध असलेली मुलगी मला भेटली. यावेली विमानतळ येथे मला भेटण्याकरिता ये म्हणून तिने सांगितले. यानंतर मी रेणुका हिला सोबत घेऊन तसाच मी विमानतळामध्ये गेलो. यावेळी तिथे तुषार सोडमिसे, अक्षय सोडमिसे, सोनू जाधव, सागर चव्हाण (सर्व रा .सोमंथळी) हे त्याठिकाणी होते. त्यांनी मला तु हिचा नाद सोडून दे, नाहीतर तुझे काही खरे नाही, तसेच तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करुन तुला कायमची अद्दल घडवु, असे म्हणून मला मारहाण केली. तसेच त्याचा माझा मोबाईल घेऊन गेले.