सातारा -फलटण येथे कोविड मृतदेहाचे अर्धवट जळालेले मांस खाणाऱ्या मनोरुग्णाला वाईजवळच्या यशोधन निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाचे पालकत्व संस्थेने स्वीकारले असून त्याच्यावर उपचार सुरु करून त्याच्या कुटुंबियांचाही शोध घेण्यात येईल, असे यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवी बोडके यांनी सांगितले.
फलटणच्या 'त्या' किळसवाण्या प्रकारातील मनोरुग्ण वाईच्या यशोधन निवारा केंद्रात
फलटण येथे कोविड मृतदेहाचे अर्धवट जळालेले मांस खाणाऱ्या मनोरुग्णाला वाईजवळच्या यशोधन निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाचे पालकत्व संस्थेने स्वीकारले असून त्याच्यावर उपचार सुरु करून त्याच्या कुटुंबियांचाही शोध घेण्यात येईल, असे यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवी बोडके यांनी सांगितले.
फलटणजवळ कोळकी ग्रामपंचायतीची स्मशानभूमी पालिकेने अधिग्रहीत केली आहे. त्याठिकाणी तालुक्यातील कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. दोन दिवसांपूर्वी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका चितेजवळ बसून हा तरुण चितेतून काही तरी काढून त्याचे तुकडे करुन खात असल्याचे निदर्शनास आले. या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने फलटणसह जिल्ह्यात या प्रकाराची मोठी चर्चा सुरू होती. नगरपालिकेला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या पथकाने जिंती नाक्यावर संबंधित तरुणाला ताब्यात घेतले होते.