सातारा -राजकीय सत्तेसाठी एकदा कराड उत्तर, नंतर दक्षिणमधून निवडणूक लढविलेले अतुल भोसले आता तिसर्यांदा निवडणूक लढवत आहेत. सत्तेसाठी सतत पक्ष बदलणार्या भोसले मंडळींना भ्रष्टाचाराचा पैसा स्वस्थ बसू देईना, असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कराड दक्षिणचे मतदार भोसलेंच्या पराभवाची हॅट्रीक करणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कराड येथील दत्त चौकात झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्यातील चारीही सभागृहाचा मी सदस्य झालो आहे. त्यामुळे मी निवडणुकीतून पळ काढणारा पैलवान नाही.आमचे विरोधक माझ्याबाबतीत बोलताना पृथ्वीराजबाबांची ही शेवटची निवडणूक असल्याचा प्रचार करत आहेत. परंतु, मी 20 वर्षे खासदार राहिलो आहे. लोकसभा, राज्यसभा, केंद्रीय मंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेचा सदस्य म्हणून काम केले आहे. जनतेच्या आशीर्वादामुळे मला हे यश मिळाले, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. मला निवडणुकीची भीती वाटत नाही. मी लढवय्या आहे. माझी चिंता तुम्ही करू नका, असला सल्लाही चव्हाण यांनी विरोधकांना दिला.