कराड (सातारा) - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक अनेकदा पाहायला मिळाली आहे. रविवारी दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी एका कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव ट्रॅक्टर चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. दसऱ्याला घेतलेल्या नवीन ट्रॅक्टरची पूजा पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद लुटला. त्यांच्या या ट्रॅक्टर राईडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पृथ्वीराज चव्हाणांनी कराड सर्किट हाऊसच्या आवारात चालवला ट्रॅक्टर - पृथ्वीराज चव्हाण यांची ट्रॅक्टर राईड
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ट्रॅक्टर चालवत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष कराडच्या शासकीय विश्रामगृहातील हे चित्र असल्याने त्या फोटोची चर्चा रंगली आहे.
कराड तालुक्यातील दुशेरे गावचे ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यशवंत आप्पा जाधव यांनी शेती कामासाठी दसर्याच्या मुहूर्तावर महिंद्रा ट्रॅक्टर खरेदी केला. ट्रॅक्टरचे पूजन पृथ्वीराजबाबांच्या हस्ते करण्यासाठी ते ट्रॅक्टर घेऊन थेट कराडच्या सर्किट हाऊसवर पोहोचले. पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरचे पूजन केले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी पृथ्वीराज चव्हाणांना ट्रॅक्टर चालविण्याचा आग्रह केला.
कार्यकर्त्याच्या इच्छेखातर त्यांनी सर्किट हाऊसच्या आवारातच ट्रॅक्टर राईड घेत कार्यकर्त्याला खूष केले. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पत्रकारांनाही पृथ्वीराज बाबांची ट्रॅक्टर राईड पहायला मिळाली. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, नगरसेवक इंद्रजित गुजर, राजेंद्र माने, इंद्रजित चव्हाण, वैभव थोरात, राहुल पवार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.