कराड (सातारा)- आत्तापर्यंत भारतात दोन प्रधानमंत्र्यांनी सोने कर्ज रूपाने घेण्याची योजना राबविली आहे. योगायोगाने दोघेही प्रधानमंत्री भारतीय जनता पक्षाचेच असल्याचे सांगून यासंदर्भात आपण केलेल्या सूचनेचा समाजविघातक प्रवृत्ती विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचे काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे आणि त्या बदल्यात १ ते २% व्याज देखील द्यावे, अशी सूचना चव्हाण यांनी केली होती. त्याविरोधातील उलट-सुलट प्रतिक्रियांवर आमदार चव्हाण यांनी खुलासा केला. ते म्हणाले, मी केलेली सूचना ही चालू सरकारी योजनेचाच भाग आहे, अशा प्रकारची योजना पहिल्यांदा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९८ च्या अणु चाचणीच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबर १९९९ साली गोल्ड डिपॉझिट स्कीम या नावाने सुरू केली होती. नोव्हेंबर २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर योजनेचे नाव बदलून गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम, २०१५ अशी नवी योजना सुरू केली.