सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट खरी आहे. पक्षात गेली अनेक वर्षे असलेल्या कटुतेचा हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तसेच दिल्लीत ठरवून राष्ट्रवादीत संघर्ष घडवून आणल्याचा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
कौटुंबिक वादाचा महाराष्ट्रावर परिणाम : शरद पवारांकडून पार्टीच्या व्यवस्थापनात काही चुका झाल्या, काही लोकांना बाजूला सारून मुलीला पुढे आणले असले तरी हा त्यांचा कौटुंबिक वाद आहे. मात्र या वादाचा विपरीत परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
ठरवून संघर्ष घडवून आणला: राष्ट्रवादीतील संघर्ष हा दिल्लीत ठरवून झाला असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष येत्या ११-१२ ऑगस्ट पूर्वी निर्णय घेतील. त्यावेळी सर्वजण अपात्र ठरतील, असा आम्हाला विश्वास आहे. तसे झाल्यास भाजप हायकमांड मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांकडे देतील, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.