कराड (सातारा) -भुजंग प्रकटणार असे सांगत पकडलेला नाग मंदिरातील पिंडीवर ठेवणार्या पुजार्याला वनविभागाने अटक केली आहे. पाटण तालुक्यातील ठोमसे गावात ही घटना घडली. गुरुनाथ यशवंत गुरव (रा. ताईचीवाडी, ता.पाटण), असे अटक करण्यात आलेल्या पूजार्याचे नाव आहे.
नेमके काय घडले?
ठोमसे येथील ज्योतिर्लिंग मंदिराचा पूजारी गुरुनाथ गुरव याने भुजंगाच्या रुपात नाग प्रकटणार असल्याचे भाविकांना सांगितले. यानंतर गावातील रहिवासी तानाजी साळुंखे यांना पूजेचे साहित्य आणायला सांगितले. देवाची आरती सुरू असताना गुरूनाथ गुरव याने भाविकांच्या नकळत नाग जातीचा सर्प पिंडीवर ठेवला. पिंडीवर नाग प्रकट झाल्याची माहिती परिसरात समजताच आजुबाजूच्या गावातील नागरिकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली. पिंडीवर भुजंग प्रकटल्याने मंदिराच्या पूजार्याबद्दल भाविकांमध्ये सहानभुती निर्माण झाली.