कराड (सातारा) -नेदरलँडची तरूणी पॉली जेस्सीला जीप चोरीच्या गुन्ह्यात जामीनदार न मिळाल्याने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. तिची शासकीय रूग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली असता ती कोरोनाबाधित आढळून आली. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या कराड आणि मल्हारपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना होम क्वॉरंटाईन व्हावे लागले आहे.
अपघात आणि जीप चोरीचा गुन्हा दाखल
पर्यटनासाठी भारतात आलेली पॉली जेस्सी ही तरूणी निसरे फाटा (ता. पाटण) येथे रस्त्याकडेला उभी असलेली जीप सुरू करून भरधाव कराडकडे येत होती. कराडजवळ आल्यानंतर जीपने वॅगनर कारला पाठीमागून धडक दिली आणि जीप पलटी झाली. या दरम्यान, तिच्या जीपने अनेक वाहनांना हुलकावणी दिली होती. याप्रकरणी कराड शहर आणि मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात अपघात आणि जीप चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस होम क्वॉरंटाईन
कराड शहर पोलिसांनी अपघाताच्या आणि मल्हारपेठ पोलिसांनी जीप चोरीच्या गुन्ह्यात पॉली जेस्सीला अटक करून न्यायालयात हजर केले. दोन्ही गुन्हे जामीनपात्र होते. मात्र, तिला जामीनदार मिळू शकला नाही. त्यामुळे न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडीत नेण्यापुर्वी तिची कोरोना चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे पोलीस स्टेशन आणि न्यायालयीन प्रक्रियेवेळी संपर्कात आलेल्या पोलिसांना होम क्वॉरंटाईन होण्यास वरिष्ठांनी सांगितले आहे.
नेदरलँड दूतावासाला देण्यात आली माहिती
पॉली जेस्सीच्या संदर्भात नेदरलँड दूतावासाला कळविण्यात आले आहे. नेदरलँड दूतावासाकडून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क संपर्क साधला जाईल. तिचे कुटुंबीय आल्यानंतर तीला त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
हेही वाचा-शेतकरी नाकारत असताना सरकार कायदे का लादत आहे - प्रफुल पटेल