सातारा - विधानसभा निवडणुकांसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडले. साताऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तर, लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. या दोन्ही निवडणुकांसाठी मतदान करायचे असल्यामुळे मतदानाची वेळ निघून गेल्यावरही मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. कराडमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते.
कराडमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रांवर पोहोचले, त्या सर्वांचे मतदान घेण्यात आले. मात्र, दोन निवडणुकांसाठी एकत्र मतदान करायचे असल्यामुळे मतदान प्रक्रियेस उशीर होत होता. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांची गर्दी राहिल्याने, अनेक गावांमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. साताऱ्यात विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ६६ टक्के, तर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सुमारे ६४ टक्के मतदान झाले.