कराड (सातारा) -कराड पंचायत समितीच्या माजी सभापतीसह त्यांच्या 22 वर्षीय मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कराड तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अहवाल आल्यानंतर माजी सभापतीच्या मूळ गावात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या दोघांवर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या विशेष कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.
माजी सभापतीच्या मुलाचे मलकापूर येथील आगाशिवनगरमध्ये कपड्याचे दुकान आहे. दुकानामुळे ते नागरिकांच्या संपर्कात आले होते. त्यातून माजी सभापतीसह त्यांच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी पुणे प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालामध्ये कराड तालुक्यातील आणखी तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये तळबीड येथील 26 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 30 वर्षीय महिला आणि पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आज सकाळी एन. सी. सी. एस. पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या सातारा जिल्ह्यातील 14 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 818 वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 155 कोरोनाबाधित रुग्णांच्या वर उपचार सुरू आहेत. 624 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 39 रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून 200पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.