सातारा - कोरोना साथीच्या संसर्गाचा गैरफायदा घेत मुदतबाह्य (एक्सपायर) हँडवॉशच्या विक्रीचा कराड पोलिसांनी पर्दाफाश करत सुमारे अडीच लाखांच्या हँडवॉशचा साठा जप्त केला. कराड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर लाईफ नावाचे हँडवॉश वितरित केले होते.
कराडमध्ये मुदतबाह्य हँडवाॅशचा अडीच लाखांचा साठा जप्त
कोरोना साथीच्या संसर्गाचा गैरफायदा घेत मुदतबाह्य (एक्सपायर) हँडवॉशच्या विक्रीचा कराड पोलिसांनी पर्दाफाश करत सुमारे अडीच लाखांच्या हँडवॉशचा साठा जप्त केला.
या मुदतबाह्य हँडवॉशमधून फक्त पाणी येत असल्याच्या तसेच त्याचा वापर केल्यानंतर हाताला खाज सुटत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार डीवायएसपी सूरज गुरव यांच्या पथकाने कराड बसस्थानकाशेजारील एका मेडीकल दुकानाच्या गाळ्यावर छापा मारला. त्याठिकाणी हँडवॉशचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तो साठा जप्त केला. अमजद मुल्ला (रा. रविवार पेठ, कराड) याने मेडीअर्थ अँड सर्व्हिसेसला मुदत संपलेल्या हँडवॉशचा पुरवठा केला होता. त्यांनीही मुदतबाह्य हँडवॉश जाणीवपूर्वक आणि जादा दराने ग्रामीण भागात वितरीत केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अडीच लाखांचा मुदतबाह्य हँडवॉशचा साठा जप्त करून संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्याच्या आपत्तीचा गैरफायदा घेऊन कोणी सॅनिटायझर, हँडवॉश अथवा बिस्किटांची जादा दराने विक्री करत असेल, तर पोलिसांना कळविण्याचे आवाहन डीवायएसपी सूरज गुरव यांनी केले आहे.