सातारा- कोरोना संकटामुळे शासनाने सामुदायिकरित्या एकत्र येत कार्यक्रम साजरे करण्यास मनाई केली आहे. मात्र, सातारा शहराजवळील हॉटेल सातारा पॅलेसमध्ये शनिवारी रात्री उशीरापर्यंत सुमारे 20 जणांच्या टोळक्याने 'वाढदिवसाची पार्टी’ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सातार्यातील एका डॉक्टरच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कमलेश निकम, अमोल घाडगे, दत्तात्रय कमाने, दत्तात्रय धुमाळ यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विजय गायकवाड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हॉटेलमध्ये डॉक्टरच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी; 20 जणांवर गुन्हा दाखल - case register on 20 youth
हॉटेल सातारा पॅलेसमध्ये वाढदिवसाची पार्टी साजरी करणे साताऱ्यातील युवकांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी या प्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात एका डॉक्टरच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, असे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना शनिवारी मध्यरात्री साडेअकरा वाजता घडली आहे. पोलिसांना हॉटेल सातारा पॅलेससमोर गर्दी दिसली. पोलीस गाडीतून खाली उतरुन धरपकड करण्यासाठी जात असताना संशयितांनी तेथून अंधाराचा गैरफायदा घेऊन पळ काढला. चौकशीत हॉटेल सातारा पॅलेसमध्ये पार्टी झाल्याचे समोर आले.
पोलिसांनी हॉटेल सातारा पॅलेसमध्ये धाव घेवून पाहणी केली असता आतमध्ये जेवणाची ताटे, दारुच्या बाटल्या पडलेल्या होत्या. दारुच्या परवानगीबाबत पोलिसांनी विचारल्यानंतर हॉटेलचे कर्मचारी निरुत्तर झाले. पार्टी कोणाची? अशी विचारणा केल्यानंतर हॉटेलमधील कर्मचार्यांनी हॉटेल मालकांच्या परवानगीने एका डॉक्टरच्या मुलाची वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती, असे सांगितले.