सातारा- बुद्रुक येथील पांडुरंग विठ्ठल सूर्यवंशी (वय 58) यांना गावातीलच भरत आत्माराम पाटील याने लाकडी दंडक्याने मारहाण केली. डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकीही दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याची तक्रार पांडुरंग सूर्यवंशी यांनी पाटण पोलिसात दिली आहे.
हेही वाचा-'ती' बातमी साफ खोटी, कोरोनामुळे राज्याचे जिल्हानिहाय 'झोन' केलेले नाहीत - विश्वजीत कदम
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, बुद्रुक येथील पांडुरंग सूर्यवंशी आणि त्यांचा चुलत भाऊ सदाशिव महादेव सूर्यवंशी हे दोघे त्यांच्या उभ्या पट्टी नावाच्या शिवारात असलेल्या विहिरीवरील मोटार काढण्यासाठी निघाले होते. यावेळी गावातीलच भरत पाटील याने त्यांच्या वाटेत दगड लावून रस्ता बंद केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी भरत पाटील तुम्ही आमची वाट बंद का केली अशी विचारणा केली. यावेळी भरत पाटील याने बाचाबाची, शिवीगाळ करत हातात असलेल्या लाकडी दांडक्याने पांडुरंग सूर्यवंशी यांच्या डोक्यावर आणि तोंडावर जोराने मारहाण केली. यात ते जखमी होऊन खाली पडले. तरीही भरत पाटील हे थांबले नाहीत, त्यांनी स्वतःजवळ असलेली पिस्तुल काढून पांडूरंग सूर्यवंशी यांच्या डोक्याला लावली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, यावेळी सदाशिव सूर्यवंशी यांनी भरत पाटील याच्या हातातील रोखलेले पिस्तुल हिसकावली. त्यानंतर लगेचच सूर्यवंशी बंधूनी पाटण पोलीस ठाणे गाठले. घडली सर्व माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पाटणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी भरत पाटील आणि एक अनोळखी व्यक्ती फरार असून जितेंद्र सूर्यवंशी याला अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याचा अधिक तपास पोलीस तृप्ती सोनवणे या करत आहेत. या प्रकरणामुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.