सातारा- विनापरवाना वाळूचे उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सहा अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून 35 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महेश शशिकांत हिरवे (वय 21) रा. कुरवली, ता. खटाव, गौरव आनंदराव पवार (वय 28) रा. उबंरडे, ता. खटाव, योगेश सुरेश राऊत (वय 22) रा. सातेवाडी, ता. खटाव, आकाश सुरेश गोडसे (वय 23) रा. कुरवली फाटा, ता. खटाव, श्रीकांत विठ्ठल बनसोडे (वय 22), रा. वडुज, ता. खटाव, मंगेश मधुकर मोहिते (वय 25), रा. वडुज, ता. खटाव अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक करणार्यांना विरोधात कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करुन कारवाईच्या सूचना केल्या होत्या.
आज सोमवारी सकाळी सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वाकेश्वर, ता. खटाव गावच्या हद्दीत विठोबाचा माळ नावाच्या शिवारात, येरळा नदी शेजारील ओढ्यात छापा टाकला. तिथे वरील सहा जण जेसीबीच्या साहाय्याने डंपरमध्ये वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले.
त्यांच्याकडे वाळू उत्खनन व वाहतूक परवाना नसल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जेसीबी, लेलँड कंपनीचा डंपर असा एकूण 35 लाख 18 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करून त्यांच्याविरोधात आपत्ती निवारण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.