सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनीही जिल्हाच्या सीमा सील केल्या आहेत. त्यांनी वाधवान कुटुंबावर गुन्हे दाखल केले मात्र, स्थानिक पातळीवर सुरु असलेला मोठा गैरकारभार समोर येत आहे. काही ठिकाणी कारवाई करून प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवण्यात येत आहेत. असाच काहीसा प्रकार माण तालुक्यातील म्हसवड येथे पाहायला मिळाला.
नागोबाच्या माळावरचा ५ लाखांचा डाव कोणाच्या खिशात..?
सातारा जिल्ह्यात स्थानिक पातळीवर सुरु असलेला मोठा गैरकारभार समोर येत आहे. काही ठिकाणी कारवाई करून प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवण्यात येत आहेत. असाच काहीसा प्रकार माण तालुक्यातील म्हसवड येथे पाहायला मिळाला.
कोरोनाच्या भितीने अनेक मुबंई आणि पुणेकर गावी आले आहेत. या मंडळींनी जुन्या आठवणींना उजाळा देत मागील आठवड्यात म्हसवड जवळील नागोबाच्या माळावरती मंदिर परिसरात आणि पळशीमध्ये मोठे डाव भरवले. थोडं थोडके नव्हे तर तब्बल ५ लाखाच्या वरती डाव पडले. या अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत मुद्देमालही मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला. या डावात माजी नगरसेवक तसेच राजकीय नेते, व्यापारी देखील सामील होते. काही लोक पळून गेले तर काही सापडले. मात्र, पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल कोणच्या खिशात गेला? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गुन्हाच नोंद केला नाही. हे प्रकरण मिटले असल्याची चर्चा आहे.
या कारवाईवेळी पेट्रोलिंग करण्यासाठी खासगी गाडीचा वापर करण्यात आला होता. नागोबा परिसरात 5 लाखांच्या वर रक्कम व पळशी परिसरात ८० हजार रक्कम हस्तगत केल्याची चर्चा होती. मात्र, याची माहिती म्हसवडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील लागू दिली नसल्याचे समजते. विशेष म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी घरपोच काहींना पाकिटे गेल्याची चर्चा आहे. तसेच पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
यावेळी नागोबा माळावर पळून जात असताना एका माजी नगरसेवकाचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याचीही चर्चा आहे. या प्रकरणाची चौकशी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी करून नक्की पोलिसांनी कारवाई केली की तोतया पोलिसांनी हे समोर आणावे.