सातारा- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभेच्या निमित्ताने आज साताऱ्यात येत आहेत. सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर दुपारी 2 वाजता पंतप्रधानांचे आगमन होणार आहे. त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून साताऱ्याला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. तर सभेच्या ठिकाणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनाही पोलिसांनी अडवले. मी सातारा जिल्हाधिकारी आहे, अशी ओळख सांगूनही पोलिसांनी त्यांना आत सोडले नाही. त्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान सैनिक स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारातून सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या गाडी घेऊन जात होत्या. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. मी सातारा जिल्हाधिकारी आहे, अशी ओळख सांगूनही पोलिसांनी त्यांना आत सोडले नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच पोलीस अडवत असतील तर सामान्यांचे काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
हेही वाचा -शरद पवार उद्या शंभूराजसह उदयनराजेंचा घेणार समाचार
लोकसभेची पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजप-सेना युतीच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच साताऱ्यात येत आहेत. तर तब्बल 30 वर्षानंतर एखादा पंतप्रधान साताऱ्याला भेट देत आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात अभूतपूर्व असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणासह स्थानिक पोलिसांनीही कंबर कसली आहे. सभास्थळी चिटपाखरूही फिरकू न देण्याची दक्षता सुरक्षा यंत्रणा घेत आहे.
हेही वाचा -गड किल्ल्यांबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला - उदयनराजे भोसले
गेल्या 3 दिवसांपासून साताऱ्यासह सुमारे 4 ते 5 जिल्ह्यातील पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला आहे. यासोबतच राज्य राखीव पोलीस दलही साताऱ्यात बंदोबस्तासाठी आहे. आज दुपारी 2 वाजता पंतप्रधान मोदींचे आगमन होणार आहे. पुण्यावरुन निघालेले मोदींचे हेलिकॉप्टर सैनिक स्कूलच्या प्रांगणातील हेलिपॅडवर त्यांचे लँड होईल.