कराड (सातारा) - जिल्ह्यातील कराडच्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीसाठी मान्यता मिळाल्यानंतर आज प्लाझ्मा संकलन केंद्र सुरू झाले. तसेच हॉस्पिटलमधील तीन कर्मचार्यांनी प्लाझ्मा दान केला असून इतरांनीही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी केले.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा संकलन केंद्र सुरू; तीन कर्मचार्यांनी केला प्लाझ्मा दान
कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीसाठी मान्यता मिळाल्यानंतर आज प्लाझ्मा संकलन केंद्र सुरू झाले. हॉस्पिटलमधील तीन कर्मचार्यांनी प्लाझ्मा दान केला असून इतरांनीही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापपर्यंत प्रभावी औषध अथवा प्रतिबंधक लस तयार झालेली नाही. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी प्लाझ्मा थेरपी हा एक आशेचा किरण आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजाविणार्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळाली आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा संकलनासाठी स्वतंत्र प्लाझ्माफेरेसिस युनिट उभारण्यात आले असून रक्तातून प्लाझ्मा घटकांचे विलगीकरण करणारी यंत्रणाही उपलब्ध करण्यात आली आहे.
प्लाझ्मा संकलन केंद्राचे उद्घाटन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर लगेच कृष्णा हॉस्पिटलमधील 3 कर्मचार्यांनी प्लाझ्मा दान केला. जे रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, अशा रुग्णांनी आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. विश्वास पाटील, राजेंद्र संदे उपस्थित होते.