कराड (सातारा) - सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा आणि पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. सतीश पाटील, अमर मगरे आणि इंद्रजित ओव्हाळ, अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
खबर्यामार्फत मिळाली होती माहिती -
कोळेवाडी (ता. कराड) येथील एमएसईबी सबस्टेशनजवळ २००० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन तिघेजण येणार, अशी माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना खबर्यामार्फत मिळाली होती. साबळे यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना कळविले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साध्या वेशात कोळेवाडी येथील एमएसईबी सबस्टेशन परिसरात सापळा लावला.
कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, तीनजण कोळेवाडी एमएसईबी सबस्टेशनजवळ आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना हटकले. त्यामुळे तिघेही पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता तिघांजवळ २००० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. तसेच तिघांमधील एकाच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तुलही आढळले. याप्रकरणी तिन्ही संशयितांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.