महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फलटणचे पोलीस उपअधीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांनी एका प्रकरणात अडीच लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.

फलटण पोलीस

By

Published : Apr 20, 2019, 12:31 PM IST

सातारा- फलटण पोलीस उपविभागीय कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) डॉ. अभिजीत पाटील यांना अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे व सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस जिल्हा दौऱ्यावर असताना ही कारवाई झाल्याने पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी, डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांनी एका प्रकरणात अडीच लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर अडीच लाख रुपयांवर तडजोडी अंती सुमारे दीड लाख रुपयांची स्टेटमेंट ठरली. लाचेची रक्कम बुधवारी स्वीकारणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग फलटणमध्ये आला. लाचेसंबंधी एसीपीचे पथक फलटणमध्ये आल्याचे समोर आल्यानंतर डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील हे नाट्यमयरित्या बेपत्ता झाले.

घटनेची व्याप्ती वाढल्याने अखेर पुणे एसीबीने सातारा एसीबी विभागाला याची माहिती देऊन मदतीसाठी पाचारण केले. तोपर्यंत लाचेसंबंधीची माहिती फलटण येथे पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुमारे एक तासानंतर डीवायएसपी डॉ.अभिजीत पाटील हे एसीपी पथकाला सापडले. एसीपी पथकाने त्यांच्याकडे प्राथमिक चौकशीला केली.

फलटणमध्ये ही कारवाई झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. दरम्यान, बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा (कोरेगाव) येथे प्रचारासाठी सायंकाळी आले होते. एकीकडे मुख्यमंत्री जिल्ह्यात असताना दुसरीकडे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी लाचखोरी प्रकरणात सापडल्याने चर्चेला उधाण आले. रात्री उशिरापर्यंत डॉ. अभिजीत पाटील यांच्याकडे चौकशी सुरू होती. यासंदर्भात एसीबीच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. असता त्यांनी या वृत्ताचा दुजोरा देऊन डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांना ताब्यात घेतले असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या सर्व कारवाईसाठी एकूण तीन पथके तयार करण्यात आली होती. त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती.

कोण आहेत डॉ. अभिजीत पाटील?

डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील हे मूळचे कोल्हापूर येथील आहेत. वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगलीमधून यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०११ साली लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून प्रमोशन होणार होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details