सातारा - शहरात यापूर्वी ३ व ५ किलोमीटर परिसरात कोअर आणि बफर झोन होते. यापुढे विशेषत: शहरी भागात स्थानिक परिस्थितीनुसार हे क्षेत्र निश्चित करण्यात येईल. नव्या कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारच्या सवलती राहणार नाहीत. औषधे, भाजी, दूध आदींची घरपोहोच व्यवस्था सध्याप्रमाणे सुरू राहील. शहराच्या इतर नाॅन कंटेनमेंट क्षेत्रात त्यावेळच्या निर्देशांनुसार हालचालींना सवलत राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शहरी आणि ग्रामीण नाॅन कंटेनमेंट क्षेत्रात दुचाकी व चारचाकी वाहनांना अध्यादेश आल्यानंतर परवानगी दिली जाईल. दुचाकीवर फक्त एक आणि चारचाकीत चालक अधिक दोन जण अशाच प्रवाशांना खासगी वापरास परवानगी असेल. माॅल्स, व्यापारी संकुले आदी ठिकाणी कापड, सराफा दुकाने आदी प्रकारची अत्यावश्यक नसलेली दुकाने उघडता येणार नाहीत. फक्त औषधे, फळे-भाजीपाला, किराणा, कृषीशी निगडित दुकाने, ट्रॅक्टर दुकाने लवकरच सुरू करण्यात येतील, असेही ते म्हणाले.