सातारा -‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट ( Satara Fake Electric Bill Massage Scam ) नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असा मेसेज तुम्हांला आला तर सावधान! कारण अशा मेसेजद्वारे बिलाची रक्कम भरुन घेऊन लुबाडणूक करण्याचा गोरखधंदा भामट्यांनी सुरु केला आहे. सातारा जिल्ह्यात तसेच मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सातारा शहरातही काहींना गेल्या काही दिवसांपासून बनावट मेसेज येऊ लागले आहेत. तर वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येणाऱ्या परंतु महावितरणशी संबंधित नसलेल्या ‘एसएमएस’ किंवा व्हॉट्स अॅप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कसा आहे हा स्कॅम? -
कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वीजबील थकीत राहते. अशा थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. याचाच फायदा भामट्यांनी उठवला आहे. थकीत बील भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून 'एसएमएस' येतो. त्यात रात्री वीज कापली जाण्याची भिती दाखवली जाते. त्यामुळे ग्राहक अलगत भामट्यांच्या जाळ्यात ओढले जातात. पैसे भरण्यासाठी एखादी लिंक पाठविण्यात येते. त्याद्वारे आर्थिक फसवणूक केली जाते.
'वैयक्तिक संपर्काचे आवाहन नाही' -
यासंदर्भात महावितरणचे सातारा शहराचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात. त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले जात नाही.