सातारा -निरा देवधर पाणीप्रश्न आता चांगलाच पेटला आहे. नीरा देवघर धरणाचे 55 टक्के पाणी पुन्हा डाव्या कालव्यात सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात फलटण शहरातून नीरा देवधर पाणी संघर्ष समितीने निषेध मोर्चा काढला.
नीरा देवधर पाणीप्रश्न पेटला, फलटणमध्ये संघर्ष समितीकडून निषेध मोर्चा - फलटणमध्ये मोर्चा
नीरा देवघर धरणाचे पाणी पुन्हा बारामतीला वळवल्याच्या निषेधार्थ फलटणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे.
फलटण, माळशिरस, खंडाळा तालुक्यातील जनतेला हक्काचं पाणी मिळावं यासाठी फलटण तहसीलदारांना निवेदनही यावेळी देण्यात आले. नीरा देवधरचे पाणी लाभक्षेत्रातील पुन्हा बारामतीला वळल्याच्या निषेधार्थ आज फलटण शहरात बंद पाळण्यात आला आहे. मागील दोन दिवसापूर्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही लढाई न्यायालयात व रस्त्यावर लढणार असल्याचे देखील सांगितले होते.
नीरा-देवधरचे पाणी बारामतीला पवारांनी पळवले जात असल्याचे सिद्ध करत तत्कालीन भाजप सरकारला ते पाणी बंद करण्यास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाग पाडले होते. त्यावेळी त्या प्रश्नावरून मोठे राजकारण तापले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नीरा डाव्या कालव्याचं पाणी पुन्हा एकदा बारामतीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दुष्काळी भागातील हक्काच्या पाण्यावर पुन्हा एकदा ‘दादा’ गिरी होत असल्याने यावरून राजकारण तापले आहे. बेकायदेशीर पाणी वापरास आपला विरोध असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले.