कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील हारूगडेवाडी-नवारस्ता येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या दोन खडी क्रशरवर महसूल विभागाने कारवाई केली. या कारवाईत क्रशरवरून 1 हजार 650 किलोची स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. पाटणचे तहसीलदार योगेश टोंपे यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्फोटकांसह 12 पोकलॅन मशीन जप्त केली. तसेच याप्रकरणी दोन्ही क्रशर सील करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटण तालुक्यातील खडी क्रशरवर धाड, स्फोटकाच्या साठ्यासह 12 पोकलॅन जप्त - पाटण खडी क्रशरवर कारवाई न्यूज
पाटण तालुक्यातील हारूगडेवाडी-नवारस्ता येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या दोन खडी क्रशरवर महसूल विभागाने कारवाई केली. या कारवाईत क्रशरवरून 1 हजार 650 किलोची स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाने पाटणचे तहसीलदार योगेश टोंपे यांनी हारूगडेवाडी आणि नवारस्ता (ता. पाटण) येथे सुरू असलेल्या दोन बेकायदेशीर खडी क्रशवर कारवाई केली. कारवाईवेळी महसूल अधिकार्यांना क्रशरच्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेली स्फोटके (डिटोनेटर्स) आढळली. तब्बल 1 हजार 650 किलो स्फोटके महसूल विभागाच्या हाती लागली आहेत. तहसीलदार टोंपे यांनी तातडीने पाटण पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पाटणचे डीवायएसपी अशोक थोरात, पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्फोटके आणि 12 पोकलॅन मशीन जप्त करून दोन्ही क्रशर सील केले आहेत.
क्रशरच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये 69 डिटोनेटर्स आणि स्फोट घडविण्यासाठी लागणारे साहित्याचा समावेश आहे. एकूण 1 लाख 99 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत गुन्हा नोंद केला आहे. जप्त करण्यात आलेल्या स्फोटकाचा साठा सूर्यकांत यादव (पुसेसावळी, ता. खटाव) यांचा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. स्फोटके हाताळण्याची जबाबदारी असलेले सूर्यकांत करजगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सूर्यकांत यादव (रा. पुसेसावळी, ता. खटाव), सुनील लक्ष्मण माथने (रा. नवारस्ता, ता. पाटण) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाटणचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे हे या घटनेचा तपास करत आहेत.