महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचे सर्वाधिक सावट पाटण तालुक्यावर, पुणे-मुंबईतून आलेल्यांनी लावला स्थानिकांच्या जीवास घोर - patan taluka corona news

मागील दोन तीन दिवसात अगदी कोरोनाची भीती संपली किंवा मोडली या अविर्भावात लोक राजरोसपणे घराबाहेर पडू लागले आहेत. अत्यावश्यक सेवा, खरेदीच्या नावाखाली रस्ते अथवा चौकाचौकात टोळक्यांनी पुन्हा लोक कोणत्याही खबरदारीशिवाय एकत्र येवू लागले आहेत. वास्तविक स्थानिक मंडळीनी सातत्याने सौजन्य दाखविले असले तरी मुंबई, पुणे आदी शहरातून आलेली मंडळींनी हे वातावरणच गढूळ करून टाकले आहे.

patan taluka people neglected to effect of corona virus in satara
कोरोनाचे सर्वाधिक सावट पाटण तालुक्यावर, नागरिकांमध्ये नाही गांभीर्य

By

Published : Mar 29, 2020, 8:01 PM IST

सातारा - कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र भलेही मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, पाटण तालुक्यात व प्रामुख्याने शहरात मुंबई आदी शहरातून आलेल्यांनी अक्षरशः या खबरदारीचे तीन तेरा वाजवले आहेत. गेल्या काही दिवसांत तब्बल 45 हजाराहून अधिक लोक मुंबई, पुणे आदी शहरातून येथे आल्याने कोरोनाचे सर्वाधिक सावट पाटण तालुक्यावर आहे. परंतु प्रशासनाने कितीही डोकेफोड केली, तरी त्याचा तितका गांभीर्याने कोणावरही परिणाम होत नसल्याचे विदारक चित्र आहे.

रस्ते, भाजी मंडई आदी ठिकाणी तर संबंधितांना आवरणे अशक्य झाल्याने व कारवाईवर काही मर्यादा आल्याने पोलीस यंत्रणा सध्या मवाळ भूमिकेत गेली आहे. त्याचा गैरफायदा घेतल्याने येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाला जणू काही आमंत्रणच दिले जात असल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आता पोलीस व महसूल आदी संबंधित यंत्रणांनी कठोर पावले उचलली नाहीत, तर अशा विकृत समाजकंटकांमुळे येथे जे खबरदारी घेतात त्यांचे बळी जावू शकतात. याचाही गांभीर्याने विचार होणे क्रमप्राप्त बनले आहे.

पहिल्या काही दिवसात तालुका व पाटण शहरात लोकांनी या कोरोना पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी, काळजी घेत प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतू गेल्या दोन तीन दिवसात अगदी याची भीती संपली किंवा मोडली या अविर्भावात लोक राजरोसपणे घराबाहेर पडू लागले आहेत. अत्यावश्यक सेवा, खरेदीच्या नावाखाली रस्ते अथवा चौकाचौकात टोळक्यांनी पुन्हा लोक कोणत्याही खबरदारीशिवाय एकत्र येवू लागले आहेत. वास्तविक स्थानिक मंडळींनी सातत्याने सौजन्य दाखविले असले तरी मुंबई, पुणे आदी शहरातून आलेल्या मंडळींनी वातावरणच गढूळ करून टाकले आहे. वास्तविक याच मंडळींपासून सर्वाधिक धोका असल्याने त्यांना घरीच बसणे बंधनकारक असतानाही ती मंडळी अगदी येथे सुट्ट्यांची मजा लुटायला आल्याच्या अविर्भावात गाव व शहरातील वातावरण बिघडवत आहेत. अत्यावश्यक साहित्य खरेदीच्या नावाखाली देशी, विदेशी दारू कोठे मिळतेय याचा शोध घेत गल्लीबोळात फिरत असतात. तर वाट्टेल त्या दराने दारू खरेदी केली जात असल्याने मग याच कोरोनाच्या संधीचे सोने करण्यासाठी काहीजण गुपचूप अशा प्रकारे बेकायदेशीर दारूची विक्री करत असून अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाईल, अशी भीती व चर्चा होत आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात पोलीस, महसूल, नगरपंचायत आदी संबंधित यंत्रणा गांभीर्याने कार्यवाही व कारवाईदेखील करत होते. परंतु स्वतः चा जीव धोक्यात घालून इतरांच्या जीवासाठी झटणाऱ्या याच मंडळींच्या आवाहन, विनंती, सूचना व थेट आदेशालाच जर लोक जूमानत नसतील व गरज नसतानाही घराबाहेर, रस्त्यावर येवून स्वतःसह सार्वजनिक आरोग्यही धोक्यात आणत असतील तर मग या प्रशासनाचा तरी काय उपयोग? या मानसिकतेमुळे ही मंडळी ही हतबल झाल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता स्वयंस्फूर्तीनेच जर काही शिस्त, खबरदारी झाली तरच याला आळा बसेल.

याबाबत माहीती देताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. पाटील म्हणाले, की यापूर्वी आपण येथे 22 लोकांचे घरातच विलगीकरण केले होते. यात परदेशातून व शहरातून आलेल्या मंडळींचा समावेश होता. यापूर्वी 14 दिवसांची विलगीकरणाची मुदत वाढवून आता ती 28 दिवस करण्यात आली आहे. सुदैवाने अद्याप एकही संशयीत अथवा रुग्ण पाटण तालुक्यात सापडला नाही. येणारा आठवडा हा या तालुक्यातील सर्वांसाठीच महत्त्वाचा असून या काळात पूर्वीपेक्षा अधिक काळजी व खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा यातून मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला तर त्याला रोखणे हाताबाहेर जाईल. यासाठी शक्यतो लोकांनी व प्रामुख्याने शहरातून आलेल्या मंडळींनी घराबाहेर पडू नये, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details