सातारा -पाटण विधानसभा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी निकालाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर ताबडतोब कामाला सुरूवात केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक आणि रस्त्यांच्या नुकसानीचा तहसिल कार्यालयात महसूल, कृषी व बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून त्यांनी आढावा घेतला.
विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी पाटण तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात झालेल्या शेती, रस्ते आणि पुलाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आ. देसाईंनी तहसिल कार्यालयात बैठक घेतली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, अशी सूचना त्यांनी या बैठकीत केली.
पवारवाडी येथील पुलाच्या दोन्ही बाजू खचल्याने कसणी, निवी, निगडे या गावांकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. या पुलांच्या भरावाच्या कामांना तात्काळ सुरूवात करावी, असे त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना सांगितले. गारवडे येथील पुलाचे काम संबधित ठेकेदाराकडून पुन्हा करून घेण्यास देसाई यांनी सांगितले.
आपल्या आजोबांसह शेतात गेलेल्या पाच वर्षांच्या चिमुरड्याचा ओढ्यातील पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्या मुलाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करावी, तसेच शासनाकडूनही या कुटुंबाला मदत मिळण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा अशा सूचना आ. देसाईंनी केल्या. या बैठकीस महसूल, कृषी, ग्रामीण विकास, जिल्हा परीषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : सलाईनवर असतानाही मी पूरग्रस्त भागात होतो, तुमचा उमेदवार कुठे होता; शंभूराज देसाईंचा पवारांना सवाल