महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाटण विधानसभा मतदारसंघावर पुन्हा शंभू'राज' की सत्य'जित'?

सातारा पाटण विधानसभा मतदारसंघात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली असून, आज होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे पाटण मतदारसंघात पुन्हा शंभू'राज' येणार, की परिवर्तन होवून सत्य'जित' येणार याबाबत मतदार आणि कार्यकर्त्यांमधील उत्सुकता वाढली असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Assembly Elections 2019

By

Published : Oct 24, 2019, 4:18 AM IST

सातारा - पाटण विधानसभा मतदारसंघात नेहमीच देसाई-पाटणकर या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी गटात 'काटे की टक्कर' पहायला मिळत असते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत इथे एकूण 1 लाख 77 हजार 50 इतके मतदान झाले होते. यापैकी, शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांना एकूण 1 लाख 4 हजार 419 मते मिळाली होती. 18 हजार 824 एवढे मताधिक्य घेऊन आ. देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकविला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना एकूण 85 हजार 595 मते मिळाली होती. त्यामुळे, जरी पराभव झाला असला, तरी 'हम भी किसी से कम नही' हे दाखवून दिले होते.

पाटण विधानसभा मतदारसंघावर पुन्हा शंभू'राज' की सत्य'जित'?

2019च्या विधानसभा निवडणुकीत, पाटण विधानसभा मतदारसंघात 1800 कोटी रुपयांची विकासकामे झाली असल्याचा दावा करत देसाई हे निवडणुकीला सामोरे गेले. तर सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत उभारलेले छोटे-मोठे प्रकल्प, त्या माध्यमातून तालुक्यात निर्माण झालेला रोजगार, युवकांच्या हाताला मिळालेले काम आणि तालुक्यात झालेली विकासकामे अशा मुद्यांवर लक्ष केंद्रित केले होते.

यावर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आ. शंभूराज देसाई आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर या दोघांमध्येच मोठी लढत होणार आहे. पाटण तालुक्यात एकूण 2 लाख 99 हजार 929 इतके मतदार असून, 2 लाख 3 हजार 129 एवढे मतदान झाले आहे. यातील 1 लाख 51 हजार 333 पुरूष मतदारांपैकी 1 लाख 4 हजार 316 पुरूषांनी मतदान केले. तर 1 लाख 48 हजार 595 महिला मतदारांपैकी 98 हजार 813 इतक्या महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. येथे एकूण 67.73 टक्के मतदान झाले. 2014च्या विधानसभा निवडणुकांवेळी इथे 72 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे 2014च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी चार टक्क्याने घसरलेली पहावयास मिळत आहे.

हेही वाचा : सातारा लोकसभा मतदारसंघातील रयतेचा कौल कोणाला? राजे राखणार का गड

ABOUT THE AUTHOR

...view details