महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर, प्रीतिसंगमासह सर्व उद्याने राहणार बंद - कराड कोरोना न्यूज

कराडमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे येथील सर्व उद्याने बंद केली आहेत. भाजी मंडईतील 4 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशी परिस्थिती कराडवर येऊ नये, म्हणून हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

कराड
karad

By

Published : Mar 28, 2021, 10:11 AM IST

कराड : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता कराड नगरपालिका प्रशासनाने कराडमधील सर्व उद्याने बंद केली आहेत. तसेच कृष्णा घाटावर खाद्य पदार्थांचे हातगाडे उभे करण्यास रविवारपासून मनाई केली जाणार आहे. अनलॉकनंतर गजबजलेल्या प्रीतिसंगम परिसराला पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागणार आहे.

कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके

मंडईतील 4 जणांना कोरोना, 150 जणांची चाचणी -

अनलॉकनंतर महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा कहर सुरू केला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी लॉकडाऊनही लागू केला आहे. कराड शहरातही कोरोना रूग्णांचा आकडा वाढला आहे. कराडमध्ये सध्या पन्नासहून अधिक कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. त्यातच शनिवारी भाजी मंडईतील 4 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे नगरपालिका प्रशासन हादरले आहे. बाधित रूग्णांच्या घराचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. तसेच बाधितांच्या संपर्कातील लोकांचीही चाचणी केली जात आहे. आतापर्यंत त्या 4 जणांच्या संपर्कातील दीडशे जणांची चाचणी करण्यात आली आहे.

हॉटेल्स, ढाब्यांवर नियंत्रण येणार ? -

कराडमधील प्रीतिसंगम परिसर नेहमी गजबजलेला असतो. परंतु, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घाटावर मोठी गर्दी होत आहे. त्यातून कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी लवकरच हॉटेल्स, ढाब्यांवर नियंत्रण आणले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.

मास्क, सोशल डिस्टन्सचे पालन करण्याकडे नागरीक दुर्लक्ष करत आहेत. नागरीकांना कारवाईची भीती नाही. त्यामुळे नियमांचे पालन करण्याकडे नागरीक कानाडोळा करत आहेत. परिणामी कराड शहरात कोरोना रूग्णांची सख्या वाढत चालली आहे. सध्या अनेक शहरांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे. तशी वेळ कराडमध्ये येऊ नये, यासाठी कडक पावले उचलली जात असल्याचेही मुख्याधिकारी डाके यांनी सांगितले.

हेही वाचा -राज्यात आज आठ वाजल्यापासून जमावबंदी; 'हे' कडक निर्बंध लागू, सरकारकडून नवीन गाईडलाईन

हेही वाचा -काळजी घेऊन साधेपणाने होळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details